
ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने रिलायन्स ग्रुपशी संबंधित 35हून अधिक ठिकाणी आणि तब्बल 50 कंपन्यांवर छापे घातले. येस बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या घोटाळ्या प्रकरणी आज दिल्ली आणि मुंबईत ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने नोंदवलेल्या दोन एफआयआर आणि सेबी, नॅशनल हाउसिंग बँक, बँक ऑफ बडोदा तसेच नॅशनल फायनान्शियल रिपोर्टींग अथॉरिटी यांसारख्या एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
2017 ते 2019 दरम्यान अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुप कंपन्यांना येस बँकेने सुमारे 3 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. हे कर्ज बनावट कंपन्या आणि ग्रुपच्या इतर युनिट्सकडे वळवण्यात आल्याचे ईडीला प्राथमिक तपासात आढळून आले. कर्ज प्रकरणी येस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांना लाच देण्यात आली असावी असाही कयास आहे. ठरवून केलेला हा घोटाळा असल्याचा ईडीचा आरोप आहे. बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांना चुकीची माहिती देऊन पैसे हडप करण्यात आल्याचे उघड झाले.
असे आहेत आरोप
कमकुवत किंवा पडताळणी नसलेल्या कंपन्यांना कर्ज देणे, अनेक कंपन्यांमध्ये एकाच संचालकाचा आणि पत्त्याचा वापर, कर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांचा अभाव असणे, बनावट कंपन्यांना पैसे हस्तांतरित करणे आणि जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया करणे असे अनेक आरोप ईडी आणि इतर तपास यंत्रणांचे आहेत. दरम्यान, येस बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या दोन वेगवेगळ्या कर्जांशी संबंधित प्रकरणांमध्ये सीबीआयने दोन एफआयआर नोंदवले आहेत.
कंपन्यांचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले
छाप्याच्या वृत्तानंतर अनिल अंबानींच्या दोन प्रमुख कंपन्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरचे शेअर्स 5 टक्क्यांपर्यंत घसरले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेने अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि स्वतः अनिल अंबानी यांना फ्रॉड म्हणून घोषित केले होते.