प्रकल्पग्रस्तांचे माहुल ‘गैरसोयींचे आगार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील अनेक प्रकल्पग्रस्तांचे माहुल गाव अक्षरशः ‘गैरसोयींचे आगार’ बनले आहे. प्रदूषण-दुर्गंधीमुळे रहिवाशांना जगणेही मुष्कील झाले आहे. याप्रकरणी रहिवाशांनी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी माहुल वसाहतींची पाहणी करून तातडीने सुविधा पुरवण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

गैरसोयींच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी रहिवाशांबरोबर थेट संवाद साधला. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे, स्थापत्य समिती उपनगरच्या अध्यक्षा साधना माने, स्थानिक नगरसेवक श्रीकांत शेटय़े, उपायुक्त चंद्रशेखर चौरे, सहाय्यक आयुक्त घाग उपस्थित होते. दरम्यान, रहिवाशांच्या समस्यांसाठी पालिकेमार्फत ‘स्पेशल सेल’ आणि खास अधिकारी नेमण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना पालिकेमार्फत जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील असे आश्वासन यावेळी महापौरांनी रहिवाशांना दिले.

पर्यावरणमंत्र्यांकडून दखल
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीदेखील दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रहिवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

शिवसेनेमार्फत विकासकामे सुरू
माहुल भागात शिवसेनेमार्फत पाणीपुरवठा व पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप बसवणे, रूम-टॉयलेटमध्ये लाद्या बसवणे, दरवाजा, खिडक्या बसवणे, सांडपाणी वाहून नेणाऱया पाइप चेंबर व लाइनची दुरुस्ती करणे, पॅसेजमधील वायरिंगची कामे, विद्युत कामे, रूममधील गळती रोखणे, पाण्याच्या टाक्या साफ करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.

– इमारतींमध्ये पाणी आणि लिफ्ट नाही.
– केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांना त्वचाविकार जडले आहेत. शाळा, रुग्णालय, मार्केटची सुविधा नाही.

प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये ‘एसआरए’ योजनेंतर्गत घरे दिली आहेत. मात्र या घरांमध्ये मूलभूत सुविधाच देण्यात आलेल्या नाहीत. संबंधित बिल्डरने केलेल्या फसवणुकीमुळेच ही स्थिती ओढवली आहे. त्यामुळे संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात टाकले पाहिजे. – प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, महापौर