7/11 बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटला, मात्र ‘सिमी’ कनेक्शनमुळे शिक्षा कायम; सिद्दीकीला न्यायालयाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष सुटलेल्या एहतशाम सिद्दीकीला न्यायालयाने दणका दिला आहे. बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटला तरी प्रतिबंधित संघटना ‘सिमी’शी संबंधित असल्याच्या आरोपाखाली माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने सिद्दीकीला सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे.

बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खटल्यात सिमीचा सदस्य असल्याच्या आरोपावरुन माझगाव येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी 21 ऑक्टोबर 2016 रोजी सिद्दीकीला दोषी ठरवले होते. सिद्दीकीने ‘सिमी’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेबद्दल पुस्तके प्रकाशित आणि वितरित केल्याचा आरोप होता. दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात इतर चार जणांना निर्दोष सोडले होते.

सिद्दीकी हा 2006 च्या लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटला होता. मात्र प्रतिबंधित संघटना ‘सिमी’चे सदस्यत्व स्वीकारणे आणि देशविरोधी साहित्य वितरित केल्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सिद्दीकीच्या घरातून धार्मिक द्वेष पसरवणारी पुस्तके जप्त करण्यात आली होती. या खटल्यादरम्यान सिद्दीकीने आधीच 9 वर्षे कच्चा कैदी म्हणून तुरुंगात घालवली आहेत. त्यामुळे सिद्दीकीला सात वर्षांची शिक्षा झाली असली, तरी तो पुन्हा तुरुंगात जाणार नाही. कारण जुलै २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने 7/11 लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यात सिद्दीकीची निर्दोष मुक्तता झाली होती. त्याआधी त्याने एकूण 19 वर्षे तुरुंगात काढली.