
सीबीडी बेलापूर पोलीसांनी मंगळवारी एका एमबीए पदवीधर झालेल्या 33 वर्षीय तरुणाला घाटकोपर येथून अटक केली आहे. या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर लिहीला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भावना घाणेकर यांनी दिलेल्या बदनामीकारक प्रतिक्रिया, मजकुरासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशाल गोर्डे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी विशाल याला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने विशाल याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल याने दारुच्या नशेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता असा त्याने दावा केला आहे. नोकरी नसल्याने तो मानसिकरित्या खचला होता त्याला नैराश्य आले होते. पुढे त्याने दावा केला की, तो रबाळेच्या एका खासगी कंपनीत नोकरीला होता मात्र 2021च्या कोरोना महामारीत त्याच्या नोकरीवर गदा आली. त्यानंतर तो विविध कंपंन्यांना मनुष्यबळ पुरवठ्याचे काम करू लागला होता. या कामात त्याला यश आले नव्हते, त्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. विशाल हा एका सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. त्याचे वडील ट्रान्सपोर्ट एजंट म्हणून काम करतात तर आई गृहिणी. त्याची लहान बहीण कॉलेजमध्ये शिकते आहे.

























































