महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बापू सुळे, मुंबई

सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी अठरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळालाच (एमसीडीसी) बळकट करण्याची वेळ छोटय़ा-मोठय़ा सहकारी संस्थांवर आली आहे. या विकास महामंडळाच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. त्यामुळे महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलापैकी 49 कोटी रुपयांचे शेअर्स सहकारी संस्थांना शेअर्स माध्यमातून विकून निधी उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सहकारी संस्थांना सक्षम करणारे महामंडळच आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसेल तर ते इतर संस्थांना कसे बळकट करणार, असा सवाल सहकार क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सहकारी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सरकारने 2000मध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची स्थापना केली होती. मात्र 2004 पासून या महामंडळाचे कामकाज ठप्प असल्याने गेल्या आठ-दहा वर्षांत एकाही सहकारी संस्थेला ना पुरेसे भागभांडवल उपलब्ध झाले, ना मार्गदर्शन मिळाले. त्याची दखल घेत सरकारने कामकाज बंद असलेल्या या महामंडळाला बळकटी देऊन सहकार चळवळ बळकट करण्याचा निर्णय 2017मध्ये घेतला आहे. मात्र सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधीच महामंडळाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात सहकारी संस्थांना गरजेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, हे विकास महामंडळ आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्यास अपुऱया भागभांडवलामुळे आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या सहकारी संस्थांना दिलासा मिळणार आहे.

गृहनिर्माण संस्था, पतसंस्था, साखर कारखान्यांना शेअर्स घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्यातील गृहनिर्माण संस्था, पतसंस्था आणि साखर कारखान्यांनी शेअर्स खरेदी करावेत, असे आवाहन महामंडळाने केले आहे. या एका शेअर्सची किंमत एक हजार रुपये एवढी असणार आहे. हे शेअर्स खासगी संस्थांनाही खरेदी करता येणार आहेत.

सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी अवश्यक असलेला निधी उभारण्याकरिता शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांनी जास्तीत जास्त शेअर्सची खरेदी करावी.
-मिलिंद आकरे, व्यवस्थापकीय संचालक, एमसीडीसी

summary- mcdc became fund less