
धारावी, शाहूनगर परिसरातील नशेबाजांसाठी एमडी विकण्याच्या तयारीत असलेल्या एका मजुराला धारावी पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून दोन लाख 54 हजार किमतीचा 21.21 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला.
बालसुब्रह्मण्यम कनैया (40) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धारावी क्रॉस रोडवरील शिवराज मैदान परिसरात एक पेडलर एमडी विकण्यासाठी येणार असल्याची खबर धारावी पोलिसांना मिळाली. त्याआधारे वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वैभव कदम व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. कनैया त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 21.21 ग्रॅम वजनाचे एमडी सापडले. हा एमडीचा साठा त्याने कुठून आणला, तसेच तो कोणाला विकणार होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.


























































