
खेड तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरलेल्या स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडावा यासाठी येथील नाट्यप्रेमींनी अनेक प्रयत्न केले, मात्र दुरुस्तीच्या नावाखाली बंद पडलेले नाट्यगृह सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधींची मानसिकताच नसल्याने नाट्यप्रेमींचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.
पूर्वी खेड शहरात नाट्यगृहाची सोय नसल्याने या कार्यक्रमांसाठी शहरातील मोकळ्या जागांवर तात्पुरता तंबू उभारावा लागत असे. कलाकारांना आवश्यक त्या सुविधा देणे शक्य होत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असे. त्यामुळे कलाकार खेड नाट्यगृहात कार्यक्रम करण्यास उत्सुक नसत. कलाकारांची गैरसोय दूर करण्यासाठी 1995 साली खेड नगरपालिकेने शहरातील मोकळ्या जागेवर सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाट्यगृह उभारणीचा निर्णय एकमताने संमत झाला आणि 1996 साली निधीची उपलब्धता होतातच नाट्यगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली होती.
1996 साली सुरू झालेले हे काम 2000 सालात पूर्ण झाले आणि 2001 साली खेड तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणाऱ्या नाट्यगृहाच्या इमारतीचे मोठ्या थाटात उदघाटन झाले. खेड शहरात नाट्यगृह सुरू झाल्यावर या ठिकाणी अनेक दर्जेदार नाटकं येऊ लागली. मराठी रंगमभूमीवरील अनेक दर्जेदार कलाकारांचा अभिनय खेड येथील नाट्यप्रेमींना जवळून पाहता येऊ लागला. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंताच्या पहाडी आवाजातील संवादाने नाट्यरसिकांचे मन तृप्त झाले, नाटकांव्यतिरिक, अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी खेड शहरात एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाल्याने, शाळा, महाविद्यालयांचे गॅदरिंग, मिस खेड- मिसेस खेड, मिस्टर खेड यासारख्या स्पर्धा या नाट्यगृहात होऊ लागल्या, त्यामुळे खेडचे स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह हळूहळू खेडच्या सांस्कृतिक चळवळीचे मानबिंदू आणि खेड तालुक्याचे सांस्कृतिक वैभव ठरू लागले, मात्र हे वैभव फार काळ ठिकले नाही. किंबहुना नगरपालिका प्रशासनाला ते टिकवता आले नाही.
सद्यस्थितीत या नाट्यगृहाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. नाट्यगृहाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपांचे जंगल तयार झाले आहे. नाट्यगृहाचे सभागृह आणि व्हरांडा कोळीष्टके आणि धुळीने भरला आहे. नाट्यगृहाच्या स्टेजची अवस्था पाहण्यासारखी राहिलेली नाही, मेकअप रूमदेखील शेवटची घटक मोजत आहेत. मुख्य दरवाजा तुटला असल्याने नाट्यगृहाचा ताबा भटक्या कुत्र्यांनी घेतला आहे. रात्री-अपरात्री नाट्यगृहातून कुत्र्यांचे विव्हळणे ऐकू येऊ लागले आहे, तर नाट्यगृहासमोरील मोकळं मैदान पार्किंग लॉट झाले आहे. एकंदरीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या सांस्कृतिक वास्तूला बकाल रूप प्राप्त झाले आहे, मात्र तरीही लोकप्रतिनिधींना या वास्तूची डागडुजी करावी, खेडच्या सांस्कृतिक चळवळीचे मानबिंदू असलेल्या नाट्यगृहाला गतवैभव मिळवून द्यावे, असे का वाटत नाही? हे अनाकलनीय आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
इमारतीत दुर्घटनांचे सत्र सरू
लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करून नगरपालिकेने नाट्यगृह उभारले, मात्र नाट्यगृह इमारतीच्या देखभालीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने अगदी अल्वपाधीतच इमारतीची पडझड सुरू झाली. 2008 साली नाट्यगृहामध्ये एका शाळेच्या वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम सुरु असताना छताला टांगलेला पंखा निखळून खाली पडला. ही दुर्घटना विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारी होती.मात्र विद्यार्थ्यांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत एकही विद्यार्थी जखमी झाला नाही. या अपघातानंतर नाट्यगृहात आपघातांची मालिकाच सुरू झाली. पंखा निखळून पडण्याची घटना ताजी असतानाच नाट्यगृहाच्या वऱ्हांड्यातील प्लास्टर ऑफ पॅरिसचे सिलिंग खाली कोसळले. यावेळी नाट्यगृहाच्या सभागृहात कोणतातरी कार्यक्रम सुरू असल्याने सारे प्रेक्षक सभागृहात होते. त्यामुळे या दुर्घटनेतूनही प्रेक्षक बालंबाल बचावले.
गेल्या 14 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत
या दुर्घटनेनंतर नाट्यगृह सुरू ठेवणे धोकादायक झाल्याने नगरपालिका प्रशासनाने दुरुस्तीचे कारण देत नाट्यगृहाला टाळं ठोकलं. 2008 साली ठोकलेलं टाळं पुन्हा उघडावं यासाठी गेल्या 14 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, गेल्या 14 वर्षांच्या कालावधीत नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, मात्र नाट्यगृहाच्या मुख्य दरवाजावर ठोकण्यात आलेलं टाळं अद्याप उघडलं नाही. गेल्या 14 वर्षांत नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर जेवढा खर्च झाला. त्या खर्चात नाट्यगृहाची नवीन इमारत उभी राहिली असती, मात्र तरीही मोडकळीस आलेल्या इमारतीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च का करण्यात आला, हा प्रश्न खेडवासीयांना पडला आहे.






























































