
सामना प्रतिनिधी । चिरनेर
मावळ लोकसभेत विजय मिळवायचा असेल तर कार्यकर्त्यांनी आताच सावध होऊन आपापसातील मतभेद विसरावे न पेक्षा विरोधकांच्या विजयाचा गुलाल उधळेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरण येथे कार्यकर्त्यांना दिला. आता जर जोमाने लढला नाहीत तर पुढे पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि ती कोणालाही परवडणारी नसल्याची पुस्ती त्यांनी मार्गदर्शन करतांना जोडली.
राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे मतदार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार आज उरणमध्ये ठाण मांडून होते. त्यांनी आज तेरपंथी सभागृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर आनंदी हॉटेलमध्ये काँग्रेस व शेकापच्या कार्यकर्त्यांना बैठकांद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, मावळ लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक उमेश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, कामगार नेते महेंद्र घरत, भावना घाणेकर, राष्ट्रवादीचे उरण तालुकाध्यक्ष मनोज भगत, काँग्रेस तालुकाध्यक्ष जे. डी. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
आज अत्यंत मवाळ भाषेत अजित पवार कार्यकर्त्यांशी हितगुज करीत होते. पार्थ पवार यांच्या विजयासाठी शेकाप, काँग्रेस कार्यकर्त्यांकडे ते मदतीची याचना करीत होते. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना ‘मॅच फिक्सिंग’ करू नका, अशी इशारेवजासूचना केल्यावर अजित पवार सहकार्य मागतात की शेकाप कार्यकर्त्यावर अविश्वास व्यक्त करतात, असा सवाल यावर एका शेकाप कार्यकर्त्याने उपस्थित केला.
























































