
प्रकाशन व्यवसायाला नवी दिशा देणारे, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व करणारे, अनुवादाला ऊर्जा देणारे आणि प्रकाशकांनी ‘टेक्नोसॅव्ही’ होण्याचा सातत्याने आग्रह धरणारे प्रकाशन क्षेत्रातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेले मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील अनिल मेहता (56) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने प्रकाशन व्यवसायावर शोककळा पसरली.
मेहता यांना किडनी स्टोनचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दहा दिवस उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती ढासळत गेल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात वडील अनिल मेहता, पत्नी, बहीण आणि दोन मुले असा परिवार आहे. उद्या (दि.13) सकाळी 9 ते 9.30च्या दरम्यान मेहता पब्लिशिंग हाऊसच्या कार्यालयात त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
वडील अनिल मेहता यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या नामांकित प्रकाशन संस्थेची सगळी सूत्रं 1986 साली सुनील मेहता यांच्याकडे सोपविली. अल्पावधीतच त्यांनी ही संस्था नावारूपाला आणली आणि अनेक दिग्गज संस्थेशी जोडले. मराठीतील दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासोबतच विविध भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद मराठीत आणणाऱया सुनील मेहता यांनी संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले होते. अनेक आंतरराष्ट्रीय, नामांकित जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, फ्रेडरिक पह्रसाइथ, रॉबिन कुक, लिस्टर मॅक्लीन, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, डेबोरा एलिस, ली चाइल्ड झुम्पा लाहिरी यांच्यासह दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांचे एकवचनी भाग 1 आणि भाग 2 तसेच तस्लिमा नसरीन, सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी या लेखकांचे साहित्य त्यांनी प्रकाशित केले.
फ्रँकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय बुक फेअरमध्ये सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी मराठी प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व केले. मराठीत सर्वप्रथम ई-बुक्सचा प्रयोग त्यांनी राबविला.
त्यांच्या प्रकाशनाची जवळपास दीड हजाराहून अधिक पुस्तके ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. साहित्य संमेलन कुठेही असले तरी ग्रंथप्रदर्शनामध्ये मेहता पब्लिकेशनचे दालन नाही असे कधीच झाले नाही. संमेलनात पुस्तकांची खरेदी समाधानकारक होईल की नाही याचा विचार न करता ते कायमच सकारात्मक ऊर्जा घेऊन संमेलनात सहभागी झाले. नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात त्यांनी ‘मेहता साहित्योत्सव’चा अभिनव प्रयोग राबविला, ज्यात साहित्यिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टॉल घेऊन वाचक आणि लेखकांचा संवाद घडविला. अनेक प्रकाशन सोहळे त्यांनी आयोजित केले. 2012 मध्ये नॉर्वे र्येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकमेव मराठी प्रकाशक मेहता सहभागी झाले होते. प्रकाशकांनी बदलत्या काळात ‘टेक्नोसॅव्ही’ झाले पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. त्यांनीही त्याप्रमाणे त्यांच्या प्रकाशन संस्थेत बदल केले. पुस्तकांच्या पायरसी विरोधातही त्यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या निधनाने प्रकाशन व्यवसायात शोककळा पसरली आहे.
































































