
मी कायदा पाळणारा माणूस आहे. मी कोणत्याही चौकशीतून वाचण्यासाठी नाही, तर वैद्यकीय उपचारासाठी हिंदुस्थान सोडला आहे. हिंदुस्थानचे चौकशी अधिकारी कधीही डोमिनिकाला येऊन माझी चौकशी करू शकतात, असा कांगावा पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने डोमिनिका न्यायालयात केला आहे.
अँटीगुआतून बेकायदेशीरपणे डोमिनिकामध्ये प्रवेश केल्याच्या आरोपावरून मेहुल चोक्सीला डोमिनिका पोलिसांनी नुकतीच अटक केली असून त्याच्यावर तेथील उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. तसेच चोक्सीला हिंदुस्थानात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर मेहुल चोक्सीने डोमिनिका न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यामध्ये हिंदुस्थानी चौकशी अधिकारी डोमिनिकात येऊन आपली चौकशी करू शकतात असे म्हटले आहे. तसेच आपण उपचारासाठी जेव्हा हिंदुस्थानातून अमेरिकेला गेलो होतो तेव्हा आपल्याविरोधात कोणत्याही एजन्सीने वॉरंट काढलेले नव्हते, याबरोबरच त्याने अन्य बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
- डोमिनिका न्यायालयाच्या कार्यवाहीपासून वाचण्याचा माझा कोणताही हेतू नाही. तसेच माझ्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस असल्याने मी कुठेही पळून जाऊ शकत नाही.
- हिंदुस्थानच्या वतीने इंटरपोल माझा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून माझे प्रत्यार्पण व्हावे म्हणून प्रयत्नशील असून त्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे.
- बेकायदेशीरपणे डोमिनिका सोडण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मात्र न्यायालयाच्या परवानगीने मी अँटीगुआ आणि बारबुडाला जाऊ इच्छितो. कारण तेथे माझ्या प्रत्यार्पणाबाबत दोन खटले सुरू आहेत, त्याला आतापर्यंत मी एकदाही गैरहजर राहिलेलो नाही.
- पोलीस कोठडीत राहणे माझ्या प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मी 62 वर्षांचा असून मला मधुमेहाबरोबरच अन्य आजार आहेत.
- माझ्या जामिनासाठी कोर्टाला मोठी रक्कम हवी असेल तर ती मी भरू शकतो. तसेच डोमिनिकामधील माझ्याविरोधातील खटला संपेपर्यंत मी हा देश सोडणार नाही याची हमी देतो, त्याचबरोबर माझ्या राहण्याचा आणि सुरक्षेचा सर्व खर्च करण्यास मी तयार असल्याचे मेहुल चोक्सीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

























































