मेहुल चोक्सीला लवकरच हिंदुस्थानात आणणार, अँटिग्वाबरोबर प्रत्यार्पण करारावर स्वाक्षर्‍या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पीएनबी बँकेला हजारो कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी भोवतीचा फास आवळला गेला आहे. अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवून तेथे लपलेल्या चोक्सीच्या प्रत्यार्पण करारावर अँटिग्वा आणि हिंदुस्थान सरकारने स्वाक्षर्‍या केल्या आहेत. चोक्सीला लवकरच हिंदुस्थानात आणण्यात येणार आहे.

चोक्सीला हिंदुस्थानात आणण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी विरोधक मोदी सरकारवर तुटून पडले होते. हिंदुस्थानकडून पोलीस क्लियरन्स मिळाल्यानंतरच अँटिग्वा सरकारने चोक्सीला आपल्या देशाचे नागरिकत्व दिले होते. चोक्सीने अँटिग्वा सरकारकडे नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्याने सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली होती. त्यात अँटिग्वा आणि बारबुडा सीटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट ऍक्ट २०१३ च्या सेक्शन ५(२)(B)नुसार पोलीस क्लियरन्स प्रमाणपत्राचाही समावेश होता.

मुंबई पोलीस काय म्हणतात?

पोलिसांच्या क्लियरन्स प्रमाणपत्राबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, २०१५ मध्ये तत्काळ श्रेणीतून चोक्सीला पासपोर्ट जारी करण्यात आला होता. त्यासाठी पोलीस पडताळणीची गरज नसते. चोक्सीने २३ जानेवारी २०१७ रोजी पोलीस क्लियरन्स प्रमाणपत्रासाठी मुंबई आरपीओकडे अर्ज केला होता. त्यानुसार १० मार्च २०१७ रोजी मलबार हिल पोलीस स्टेशनच्या वतीने त्याला पोलीस क्लियरन्स प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर  चोक्सीने जानेवारी २०१८ रोजी देश सोडला होता.