ओमानमध्ये मेकुनू चक्रीवादळात तीन हिंदुस्थानींसह ११ ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मस्कत

दक्षिण ओमान व सोकोत्राच्या द्विपावर आलेल्या मेकुनू चक्रीवादळात तीन हिंदुस्थानींसह ११ जण ठार झाले आहेत. ओमानमधील धोफर आणि अल-वुस्ता प्रांतात शुक्रवारी मेकुनू वादळ धडकले. बघता बघता वादळाने रौद्ररुप धारण केले. या वादळात मोठे नुकसान झाले असून जीवितहानीसह आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

मस्कतमधील हिंदुस्थानच्या दूतावासाने ट्वीटरवर याबद्दल माहिती दिली आहे. यात रॉयल ओमान पोलिसांनी शमशेर अली व अन्य दोन बेपत्ता हिंदुस्थानींचे मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. तसेच चक्रीवादळात बेपत्ता झालेल्या मधू नामक व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले आहे. चक्रीवादळात अडकलेल्यांसाठी ठिकठिकाणी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये ४६० लोकांना हलवण्यात आले आहे. यात १४५ हिंदुस्थानी व ३१५ बांग्लादेशी नागरिक असून त्यांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेण्यात येत असल्याचे ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.