
येत्या २७ तारखेपासून मेळघाटातील सर्वच आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृह सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीमाडोह येथील नकली दारु तयार करणार्या टोळीला अटक केली आहे. प्रत्यक्षात चिखलदरा तालुक्यात असलेल्या सीमाडोह गावाची लोकसंख्या लक्षात घेता नकली दारु तयार करण्याचा कारखाना पोलिसांना माहित नाही हे सुध्दा एक आश्चर्यच मेळघाटवासियांना वाटत आहे.
विशेष म्हणजे सीमाडोह हे गाव परतवाडा धारणी मार्गावर असून या गावाचा संबंध आजूबाजूच्या खेड्याशी येतो. म्हणूनच या गावाला अधिक महत्व आहे. या ठिकाणी राहणारे बहुतेक नागरिक हे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आहे तर गावातील लोकसंख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. असे असतांना सीमाडोह येथे नकली दारू तयार करण्याचा कारखाना उघडण्यामागे नेमका उद्देश काय हे सुद्धा उघड झाले आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊनला सुरुवात झाली. यावेळी सर्वच ठिकाणचे अधिकृत दारु दुकाने व बार बंद झाले होते. त्याप्रमाणे मेळघाटातील आश्रमशाळा व वसतिगृह सुध्दा बंद होते. नेमका याचाच फायदा नकली दारु बनविणार्या टोळीने घेतला. यासाठी त्यांनी सीमाडोह येथील निवड केली.
सीमाडोह येथील सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. लॉकडाऊनमुळे या वसतिगृहात कुणीही राहत नसल्यामुळे त्याचा लाभ वसतिगृहाच्या प्रमुखांनी घेऊन अवैध दारु व्यवसाय करणार्या टोळीला वसतिगृहातच दारु बनविण्याची संधी दिली. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून सीमाडोह येथील नकली दारु तयार करण्याचा धंदा सुरु झाला.
एकीकडे दारु मिळणे अशक्यप्राय झाले असल्यामुळे सहाजिकच दारुड्यांनी सीमाडोहच्या दारुकडे धाव घेतली. विशेष म्हणजे सीमडोह येथे अवघ्या काही फुटाच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. ही बाब संबंधित पोलिसांना माहित असतानाही आर्थिक लालसेपोटी चिखलदरा पोलिसांनी या दारुच्या अड्ड्याकडे दुर्लक्ष केले.
आता मात्र लॉकडाऊन बंद झाल्यानंतर येत्या 27 जानेवारीपासून मेळघाटातील सर्व शाळा व वसतीगृह सुरू असल्यामुळे ही बाब उघडकीस येण्याची भीती पोलीस व संस्थेच्या पदाधिकार्यांच्या लक्षात आली म्हणूनच त्यांनी नियोजितपणे हा नकली दारुचा व्यवसाय उघडकीस आणल्याचे मेळघाटात बोलल्या जात आहे. तर पोलीस प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.


























































