
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल झाला असून ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाने एंट्री घेतली आहे. सिंधुदुर्ग, गडचिरोलीसह पुण्यातील इंदापूर भागात आज पावसाने हजेरी लावली. दरम्यान, महाराष्ट्र आणि केरळच्या विविध भागांत 13 तारखेपर्यंत पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिह्यात कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले भागात पावसाच्या आज तुरळक सरी कोसळल्या. त्याचा आंबा आणि काजू बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या अवेळी पावसाने बागायतदार चिंतातुर झाले आहेत. गडचिरोली जिह्यात दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून जिह्यात तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. पुणे जिह्यात इंदापूरमध्ये संध्याकाळी हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
हवामान विभागाने 13 डिसेंबरपर्यंत पावसाचा अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिह्यांत 16 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, तामीळनाडू, कर्नाटकचा दक्षिण भाग आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे.




























































