वीज बिलाचे पैसे तत्काळ द्या; एमईआरसीची महावितरणला तंबी

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांकडून घेतलेल्या विजेचे बिल महावितरण वेळेत देत नसल्याची बाब समोर आली आहे. त्याची महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) गंभीर दखल घेतली असून थकीत वीज बिलाचे पैसे देण्याबाबत दोन आठवडय़ांत आराखडा सादर करा, अन्यथा 18 टक्के दराने व्याज मोजा अशी तंबीच महावितरणला दिली आहे.

अपारंपरिक ऊर्जानिर्मितीअंतर्गत उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांची वीज घेण्यासाठी महावितरणने तब्बल 3700 मेगावॅटचे वीज खरेदी करार केले आहेत. त्यानुसार त्यांनी पुरवलेल्या विजेचे बिल महावितरणकडून थकवले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीएलपी विंड फार्मस् इंडिया आणि सीएलपी विंड फार्मस् खांडके या दोन कंपन्यांनी महावितरण थकीत व्याज बिलाचे वेळेत पैसे देत नसल्याची तक्रार वीज आयोगाकडे केली होती. त्यावर सुनावणी घेत आयोगाने थकीत रक्कम देण्यातबाबत आराखडा तयार करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत महावितरणला बजावले आहे. तसेच थकीत रक्कम वेळेत न दिल्यास व्याज भरावे लागेल असे स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या