
>> प्रसाद ताम्हनकर
‘मेटावर्स’ या आभासी जगात आपल्या पात्रावर अर्थात आपण घेतलेल्या ‘अवतारा’वर बलात्कार झाल्याचा आरोप एका तरुणीने नुकताच केला आहे. हा बलात्कार होत असताना दुसरा एक अवतार शांतपणे हे सर्व बघत होता आणि इतर पात्रांना व्होडकादेखील वाटत होता असेदेखील तिने आपल्या आरोपात पुढे म्हटले आहे. ‘SumOfUs’ या कंपनीने एका 21 वर्षीय तरुणीला ‘Horizon Worlds App’च्या माध्यमातून ‘मेटावर्स’मध्ये पाठवले होते. या आभासी जगात प्रवेश केल्यानंतर तासाभरातच आपले लैंगिक शोषण केले गेले असे या मुलीने सांगितले. “हे जरी आभासी जगातील माझ्या अवतारासोबत घडत असले तरी आपण तो भयंकर अनुभव प्रत्यक्षात घेतोय असे मला वाटत होते’’, असे ती म्हणाली. ‘मेटावर्स’च्या प्रवक्त्याने मात्र या मुलीने ‘सेफ्टी फीचर टूल’ चालू केले नसेल, ज्यामुळे अनावश्यक आणि अनोळखी लोकांना दूर ठेवता येते अशी विचित्र प्रतिक्रिया देत वादापासून लांब पळण्याचा प्रयत्न केला आहे.
Metaverse हे एका वेगळ्या ‘3डी’ जगाचे नेटवर्क आहे. त्यामध्ये वास्तविक जगाचे अनुकरण करताना मीटिंगपासून शॉपिंगपर्यंत गेम्सपर्यंत किंवा व्हर्च्युअल कपडे विकण्यापासून ते पैसे कमावण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. अनेक सायबर तज्ञ या ‘मेटावर्स’कडे इंटरनेटचे भविष्य म्हणून बघत आहेत. ‘मेटावर्स’चे आभासी जग वादात सापडण्याची काही ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2022मध्ये लंडनमधील एका 43 वर्षीय महिलेनेदेखील आपल्याला असाच अनुभव आल्याचा आरोप केला होता. ‘मेटावर्स’मध्ये प्रवेश केल्याबरोबर अवघ्या 60 सेकंदांत आपल्यासोबत गॅंगरेप झाल्याचा धक्कादायक खुलासा या महिलेने केला होता. विशेष म्हणजे ही महिला एका-एका कंपनीत ‘मेटावर्स’ रिसर्चची उपाध्यक्ष म्हणून काम करते. हे जणू काही आपल्यासोबत प्रत्यक्षात घडते आहे असे वाटल्याने या महिलेने आपला हेडफोनदेखील भीतीच्या अमलाखाली तोडून टाकला होता.
अशा प्रकारच्या घटनांमुळे ‘मेटावर्स’ची सुरक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडली आहे. तिच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ‘मेटावर्स’च्या उक्रांतीमध्ये लैंगिक शोषण आणि छळ हे सर्वात महत्त्वपूर्ण आव्हान असणार आहे. विशेषतः स्त्रिया आणि अल्पसंख्याकांसाठी हे आभासी जग अधिक विखारी आणि विषारी वातावरण तयार करू शकते याचा धोकादेखील अनेक तज्ञांना वाटतो आहे. या आभासी जगाचा एक असाच वेगळा धोकादेखील समोर येत आहे. इंटरनेट, व्हिडीओ तसेच विविध गेम्सचे व्यसन असलेली व्यक्ती या आभासी जगात पूर्णपणे गुरफटून जात असल्याचेदेखील समोर येत आहे. या गोष्टींच्या दीर्घकाळ वापराने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरदेखील प्रचंड अनिष्ट परिणाम आढळून येत आहेत. चिंता, नैराश्य असे आजार वापरकर्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विकसित होत आहेत. अशा व्यक्ती इतर सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लठ्ठपणा आणि हृदयरोगाच्या शिकार होण्याची शक्यता जास्ती असते.
दुसरीकडे, तज्ञांचा असा विश्वास आहे की, 2030 पर्यंत ‘मेटावर्स’मध्ये मोठय़ा संख्येने लोक असतील. मात्र त्यासाठी ‘मेटावर्स’च्या कल्पनेवर अजून खूप काम करावे लागणार आहे. पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये 800 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ यामुळे उभी राहण्याचा अंदाज आहे. मेटा (पूर्वीचे फेसबुक), गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल अशा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ‘मेटावर्स’मध्ये प्रचंड गुंतवणूक करत आहेत. अनेक छोटे छोटे स्टार्टअपदेखील यामध्ये सहभागी होत आहेत.
‘मेटावर्स’मध्ये (Metaverse) प्रवेश करण्यासाठी सध्या एकच असे ठरावीक प्रवेशद्वार नाही. सध्या, VR आणि AR हेडसेटसारखे काही हार्डवेअर वापरून तुम्ही या आभासी जगाच्या अनुभवात मग्न होऊ शकता. ही हार्डवेअर आपल्या बजेटनुसार विविध किमतीत उपलब्ध आहेत. ‘मेटावर्स’ हळूहळू जगात लोकप्रिय होत आहे. त्याचे फायदे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेत. आजकाल ‘मेटावर्स’मध्ये लग्नं पार पाडली जात आहेत, गाण्याच्या बैठका, म्युझिक कन्सर्ट साजरे होत आहेत. इतकेच काय, तर लोक या आभासी विश्वात जागादेखील खरेदी करत आहेत. अशा वेळी ‘मेटावर्स’च्या सुरक्षा फीचर्सवर प्रचंड काम करण्याची आवश्यकता आहे हे प्रामुख्याने समोर येत आहे.





























































