मुसळधार कोसळणार! मुंबई–ठाण्याला आज अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह कोकणात शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाची सोमवारीही संततधार कायम होती. मंगळवार, 27 जूनला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कुलाबामध्ये 173.4 मिमी तर सांताक्रुझमध्ये 253.1 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, 28 जूनला पालघर आणि रायगडमध्ये अतिमुसळधार तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

17 ठिकाणी झाडे पडली
मुंबईत आज दिवसभरात 17 ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. मुंबई शहरात 2, पूर्व उपनगरात 6 तर पश्चिम उपनगरात 9 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याचा घटना घडल्या. मुंबईत तीन ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगी लागल्या. शहरात 1 तर पूर्व उपनगरात दोन ठिकाणी आग लागली. मात्र, सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकरनगरात आज सकाळी साडेआठ वाजता एकमजली घराचा काही भाग कोसळून सात जण जखमी झाले. राजावाडी रुग्णालयात उपचारानंतर तीन जखमींना घरी सोडण्यात आले.

राज्यात मंगळवार, 27 जूनला पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि गोंदिया जिह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस होणार आहे.