
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘मी-टू’ प्रकरणात महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले ए. जे. अकबर यांनी पल्लवी गोगोई यांचे बलात्काराचे आरोप फेटाळून लावले होते. मात्र भीतीने सहन केलेल्या कृतीला सहमतीने म्हणता येत नाही, असा पलटवार पल्लवी गोगोई यांनी केल्याने एम. जे अकबर पुरते अडणचीत सापडले आहेत.
एम. जे. अकबर माझ्यावर बलात्कार केला असा गंभीर आरोप महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केला होता. त्यावर पल्लवी गोगोई यांचे आरोप खोटे आहेत. आमच्या दोघांत सहमतीने संबंध होते. नंतर सहमतीनेच आम्ही वेगळे झालो असे एम. जे. अकबर यांनी म्हटले होते. मात्र पल्लवी यांनी अकबर खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. ‘एक असा संबंध जो भीती निर्माण करून, बळाच्या जोरावर ठेवला जातो त्याला सहमतीने ठेवलेला संबंध म्हणत नाही. आधी जे बोलली आहे, त्या प्रत्येक शब्दावर मी कायम आहे. मी खरं ते सांगतच राहणार, कारण त्यामुळे अन्य पीडित महिलांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांवर बोलण्यासाठी बळ मिळेल. अन्यायाविरोधात आवाज उठवणं त्यांना योग्य वाटेल.’, असे पल्लवीने म्हटले आहे.
जयपूरच्या हॉटेलमध्ये त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. तेव्हा मी 22 वर्षाची होती. त्यांना मी खूप विरोध केला, पण शारीरिक दृष्ट्या मी त्यांच्यापेक्षा दुबळी होते. त्यामुळे मी हरले. त्यांनी जबरदस्ती माझे कपडे काढले आणि माझ्यासोबत दुष्कृत्य केलं. त्यावेळी मी घाबरले होते, पोलिसात तक्रार करण्याची ऐवजी स्वत:वर लज्जित झाले होते. जयपूरच्या घटनेनंतर त्यांनी फायदा घेतला आणि माझ्यावर पकड अजून मजबूत केली, असा आरोप गोगोई यांनी केला होता.

























































