मेट्रोची नाइटशिफ्ट २ ऑगस्टपर्यंत बंद

35
फाईल फोटो

सामना ऑनलाईन | मुंबई  
ध्वनिप्रदूषणामुळे उच्च न्यायालयाने मेट्रोच्या नाइट शिफ्ट कामावर बंदी घातली असली तरीही मेट्रो प्रशासनाने रात्रीही काम रेटण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. बंदी असूनही मध्यरात्री दीड वाजता दक्षिण मुंबईत मेट्रोचे खोदकाम सुरू असल्याचे याचिकाकर्त्याने गुरुवारी ध्वनीचित्रफितीद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सदर बाब मेट्रोच्या अधिकाऱयांना दाखवण्याचे आदेश देत याबाबत प्रशासनाला जाब विचारला व २ ऑगस्टपर्यंत रात्रपाळीत काम करू नये असे बजावले.

ध्वनिप्रदूषणाच्या मुद्दय़ावरून हायकोर्टाने डिसेंबर २०१७ पासून मेट्रोच्या नाइट शिफ्ट कामावर बंदी घातली आहे. याचा फटका मेट्रो प्रशासनाला बसला असून कामाची डेडलाइन हुकण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दक्षिण मुंबईत मेट्रोचे काम रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी आर्जव मेट्रो प्रशासनाने हायकोर्टाकडे केली आहे. याला दक्षिण मुंबईतील स्थानिक नागरिक रॉबिन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो कामाच्या आवाजाची पातळी मोजण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला हायकोर्टाने दिले होते. याबाबतचा अहवाल २ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येणार असल्याने हायकोर्टाने आज मेट्रोच्या नाइट शिफ्ट कामावरील बंदी कायम ठेवली. याप्रकरणी पुढील सुनावणी उद्या शुक्रवारी होणार आहे.

ध्वनिप्रदूषणाच कायदा मेट्रोला लागू होत नाही ! 

ध्वनिप्रदूषण कायदा २००० हा मेट्रो प्रशासनाला लागू होत नाही असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला, परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत ध्वनिप्रदूषणाचा कायदा मेट्रो प्रशासनालाही लागू होतो असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या