मेट्रो वन आता एक तास लवकर सुटणार

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता घाटकोपर ते वर्सोवादरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनची पहिली ट्रेन आता एक तास लवकर सुटणार आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी झाली.

नव्या वेळापत्रकानुसार, घाटकोपर आणि वर्सोवा येथून दोन्ही दिशेकडून सकाळी 5.30 च्या सुमारास पहिली मेट्रो रवाना होणार आहे. वर्सोवा स्थानकातून शेवटची मेट्रो रात्री 11.20 वाजता तर घाटकोपर स्थानकातून रात्री 11.45 वाजता सुटणार आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो वन प्रशासनाने दिली आहे.

सध्या मुंबई मेट्रो वनने दिवसाला सुमारे 3 लाख 80 हजार प्रवासी प्रवास करतात. सोमवार ते शुक्रवारी पिकअवरमध्ये दर 3.5 मिनिटांनी तर नॉन पिकअवरमध्ये साधारण 8 मिनिटांनी मेट्रोची फेरी चालवण्यात येते. वीकेण्डला आणि सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी प्रवाशांच्या गर्दीवर मेट्रोच्या फेऱ्यांचे वेळापत्रक अवलंबून असते.