सामना प्रतिनिधी । मुंबई
‘मेट्रो’च्या कामामुळे संपूर्ण मुंबईत वाहतुकीचे तीनतेरा वाजले असताना पालिकेच्या जलवाहिन्या फुटून पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून आर्थिक भुर्दंडही पडत आहे. याची गंभीर दखल घेत पालिकेने जलवाहिन्या फोडल्याप्रकरणी ‘मेट्रो’कडून 14 लाख 82 हजारांचा खर्च वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मेट्रो’च्या कामामुळे मुंबईत अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये अलीकडेच पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन वेळा मोठ्या जलवाहिन्या फुटल्या तर मुंबईत अनेक ठिकाणी छोट्या- छोट्या जलवाहिन्या फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचा 14 लाख 82 हजार रुपये हा खर्च कसूल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
- मेट्रो प्रकल्प चार अंतर्गत कुर्ला पूर्व येथे ऑगस्ट महिन्यात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. नोव्हेंबर महिन्यात घाटकोपर येथे कामराज नगर बसस्थानकाजवळ मोठी जलवाहिनी फुटली. गेल्या महिन्यात चेंबूर पूर्व येथील पोस्टल कॉलनी आणि कुर्ला स्थानक जंक्शन येथे जलवाहिनी फुटली.
बेजबाबदार कामामुळेच…
मेट्रोसारख्या प्राधिकरणांना भूमिगत कामे करताना पालिकेकडून जलवाहिन्यांचे आराखडे दिले जातात. त्यामुळे काळजीपूर्वक काम केल्यास दुर्घटना टाळून काम केले जाऊ शकते. परंतु अनेक वेळा ही प्राधिकरणे बेजबाबदापणे काम करीत असल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून हा खर्च लवकरच वसूल करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
असा झाला खर्च
- ऑगस्ट : कुर्ला पूर्व जलवाहिनी फुटली. दोन लाख 65 हजार रुपये.
- नोक्हेंबर : घाटकोपर येथील कामराज नगर बसस्टॉप – मोठी जलवाहिनी – एक लाख 17 हजार रुपये.
- चेंबूर पूर्क, पोस्टल कॉलनी आणि कुर्ला जंक्शन जलवाहिनी फुटली, छोट्या जलकाहिन्या फुटण्याच्या घटनांमध्ये 11 लाख 32 हजार रुपये दंड.

























































