
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना मेट्रोमधून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना तिकीटमध्ये 25 टक्के सवलत मिळणार आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल. राज्य शासनाने आज ही घोषणा केली.
कोणाला सवलत मिळेल?
ही सुविधा 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता 12 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या 3 श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.
या सर्व सवलती मेट्रो लाइन 2 ए आणि 7 च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला 30 दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.






























































