
मेट्रो-2 मार्गावरील दहिसर येथील आनंद नगर परिसरात असलेल्या रेल्वे स्थानकाला ‘अप्पर दहिसर’ असे नाव देण्यात आले होते. हे स्थानक आनंद नगरच्या सीमाक्षेत्रात असल्याने ‘अप्पर दहिसर’ नावाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. शिवसेनेने स्थानिकांची बाजू घेत या स्थानकाचे नाव बदलण्याची केलेली मागणी मान्य होऊन आता प्रशासनाने या स्थानकाचे नाव ‘आनंद नगर’ असे बदलल्याचे स्पष्ट केले आहे.
मेट्रो -2 (डी. एन. नगर-दहिसर) या मार्गावरील दहिसर येथील आनंद नगर परिसरात असलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकाला ‘अप्पर दहिसर’ नाव देण्यात आले होते. हे स्थानक पूर्णपणे आनंद नगरच्या हद्दीत येत असून स्थानिक रहिवाशांनी या स्थानकाचे नाव बदलून ते आनंद नगर असे ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. वसाहतीतील लोकांनी शिवसेनेचे पदाधिकारी अमीन कर्णा व सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडय़ा यांच्या नेतृत्वाखाली स्थानकाचे नाव बदलून ‘आनंद नगर’ करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांना पत्र दिले होते. घोसाळकर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना पत्र लिहून स्थानकाचे नाव ‘आनंद नगर’ करावे अशी मागणी केली होती. एमएमआरडीएने याची दखल घेऊन दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला पत्र पाठवले असता त्यांनी 24 नोव्हेंबरच्या पत्रानुसार ‘अप्पर दहिसर’ नाव बदलून ‘आनंद नगर’ या नावाला मंजुरी दिली आहे.
























































