
म्हाडा पेपर फोडीप्रकरणात मुख्य आरोपी असलेला डॉ. प्रितीश देशमुख याने एजंटांकडून आलेल्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी वेगळे प्लॅनिंग केले होते. त्यासाठी त्याला प्रत्येकी एका विद्यार्थ्यांकडून तब्बल 10 लाख रूपये मिळणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी राज्यभरातील 10 एजंटांची कुंडली तपासण्यावर सायबर पोलिसांनी भर दिला आहे.
आरोग्य भरती पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाही जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. देशमुख याने म्हाडा पेपर फोडण्याचे धाडस केले. त्यासाठी राज्यभरातील 10 एजंटांकडून त्याला कोटय़वधी रुपये मिळणार होते. एजंटांकडून म्हाडाच्या परिक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा सल।ा देण्यात आला होता. उत्तरपत्रिका तपासणीवेळी एजंट मार्फत आलेल्या परिक्षार्थीच्या ओएमआरशीटमध्ये (उत्तरपत्रिका) डॉ. देशमुख थेट मार्क देऊन त्यांना पास करणार होता. याप्रकरणी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ (बुलढाणा), संतोष हरकळ (संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली.
डॉ. देशमुख याने एजंटांसोबत केली डील
म्हाडाची लेखी परिक्षा आयोजीत करून निकालापर्यंतच्या कामाचे कंत्राट पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला दिले होते. त्याचा गैरफायदा घेऊन डॉ. देशमुख याने राज्यभरातील एजंटांकडून विद्यार्थ्यांना हेरण्यास सुरुवात केली. मार्क वाढवून देण्याच्या बदल्यात त्याने प्रत्येकी एका विद्यार्थ्यांकडून 10 लाखांची डील एजंटांसोबत केली होती. पैसे देणाऱया विद्यार्थ्यांच्या यादीनुसार त्यांना उत्तरपत्रिका कोऱया ठेवण्याचे सांगण्यात आले. संबंधित उत्तरपत्रिका जी.एस. सॉफ्टवेअर कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्क देऊन पास केले जाणार होते. मात्र, पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांमुळे त्याचा डाव उधळला आहे.


























































