मुंबईत एकही इमारत धोकादायक नाही; म्हाडाची मान्सूनपूर्व तयारी जोरात; 9048 इमारतींचे सर्वेक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाने मान्सूनपूर्व तयारी जोरात केली असून पावसाळ्यात इमारती कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच धोकादायक इमारतींचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत तब्बल 9048 इमारतींचे सर्वेक्षण केले असून त्यामध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे म्हाडाच्या इमारतींमध्ये काही अपघात झाल्यास सबंधितांना तत्काळ मदत मिळावी म्हणून नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. संक्रमण शिबिरे राखीव ठेवली आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत म्हाडाच्या 14 हजार 755 जुन्या इमारती असून त्यामध्ये लाखो कुटुंबे वास्तव्याला आहेत. या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केले जाते. गेल्या दोन वर्षात मोठय़ा प्रमाणात दुरुस्तीची कामे झाली आहेत. सध्या पावसाळ्यात कोणताही अपघात घडू नये म्हणून म्हाडाने आतापर्यंत 9 हजार 48 इमारतीच्या सर्वेक्षण पूर्ण केले असून त्यामध्ये एकही इमारत धोकादायक आढळलेली नाही. तसेच उर्वरित इमारतींचेही लवकरच सर्वेक्षण पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एखादी इमारत धोकादायक असेल तर रहिवासी, लोकप्रतिनिधीनी ते आमच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन घोसाळकर यांनी केले आहे.

तत्काळ काम करण्यासाठी चार झोनमध्ये ठेकेदारांची नियुक्ती

एखादा अपघात झाल्यास किंवा इमारत धोकादायक असल्याबाबत रहिवाशांची तक्रार आल्यास तेथील काम तत्काळ करण्यासाठी चार झोनमध्ये ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच म्हाडाचे अनेक कर्मचारी निवृत्त झालेले असल्याने पुरेशा मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची दखल घेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 23 सेवा निवृत्त कर्मचाऱयांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याचे विनोद घोसाळकर यांनी सांगितले.

दगडी चाळीतील दहा इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव

दगडी चाळीतील दहा इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाकडे आला आहे. त्याला म्हाडाने संमती पत्र (एलओआय) दिले असून इतर सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर एनओसी दिली जाईल असे घोसाळकर यांनी सांगितले.

राखीव संक्रमण शिबिरे

आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादी इमारत खाली करावी लागली तर तेथील रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कांदिवली महावीर नगर येथे 135 संक्रमण शिबिरे राखावी ठेवली आहेत. तसेच पुनर्रचित इमारतींमधील काही सदनिका राखीव ठेवल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी म्हणून ताडदेव येथे नियंत्रण कक्ष सुरू केला असून 022 23517423 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.