
तीन वेळा सोडतीत समावेश करूनही अर्जदारांच्या प्रतिसादाअभावी धूळ खात पडलेल्या सुमारे शंभर घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. तुंगा पवई, दादर, ताडदेव अशा पॉश एरियामध्ये ही कोटय़वधींची घरे असून या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा लवकरच जाहीरात प्रसिद्ध करणार आहे.
म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडतीवर अर्जदारांच्या अक्षरशः उडय़ा पडतात. परंतु किमती आवाक्याबाहेर असणे किंवा विविध कारणास्तव काही घरांना अर्जदारांचा प्रतिसाद मिळत नाही. अशी घरे धूळ खात पडल्यामुळे म्हाडाचा मोठा निधी अडकतो. शिवाय या घरांच्या सुरक्षा आणि मेंटेनन्सवर म्हाडाला आपल्या तिजोरीतून खर्च करावा लागतो. त्यामुळे तीन वेळा सोडत काढूनही ज्या घरांची विक्री झालेली नाही अशा जवळपास शंभर घरांची यादी म्हाडाने तयार केली असून या घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई मंडळाकडून मंजुरीसाठी प्राधिकरणाला पाठवण्यात येईल. प्राधिकरणाची मंजुरी मिळताच या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.
बाजारभावापेक्षा म्हाडाच्या घरांच्या किमती कमी असल्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावरील या घरांची विक्री हातोहात होईल आणि प्राधिकरणाचा अडकून पडलेला निधी मोकळा होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
म्हणूनच घेतला निर्णय
ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरांचीदेखील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री होणार आहे. म्हाडाने पहिल्यांदा 2023 च्या सोडतीत येथील सात घरांचा समावेश केला होता. 7 कोटी 52 लाख ते 7 कोटी 57 लाख यादरम्यान घरांच्या किमती ठेवल्या होत्या. विक्री न झाल्याने 2024 च्या सोडतीत या घरांच्या किमती एक ते दीड कोटी रुपयांनी कमी केल्या. तरीही या घरांची विक्री झालेली नाही. या घराच्या मेंटेनन्सपोटी म्हाडाच्या तिजोरीतून दरमहा सुमारे दीड लाख रुपये खर्च होत आहेत.






























































