तालुक्यातील म्हासुर्ली ते गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडी बंधाऱयादरम्यान असलेला अवघ्या 100 ते 150 मीटरचा रस्ता सरकारी अनास्थेचा बळी ठरला आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखलाच्या दलदलीमुळे रस्त्याची घसरगुंडीसारखी अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाल्याने वाहतूक करणे जिकिरीचे ठरत आहे. गेले अनेक वर्षे येथे छोटे-मोठे अपघात घडत असून, एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
परिते-राशिवडे-म्हासुर्ली-धुंदवडे अणदूर गावांतून जाणारा हा रस्ता गगनबावडा तालुक्यातील शेणवडे येथे कोल्हापूर-गगनबावडा ते कोकण महामार्गाला जोडणारा अंतर्गत जिल्हा मार्ग आहे. गगनबावडय़ाकडे जाणारा कमी अंतराचा हा मार्ग तयार झाल्याने या मार्गावर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. आतापर्यंत या मार्गावर इतर ठिकाणी शासनाने रस्त्यावर खर्च केला आहे. मात्र, याच मार्गावरील म्हासुर्ली बाजारपेठ ते धामणी नदीपलीकडील चौधरीवाडी दरम्यान सुमारे एक किलोमीटरचा रस्ता याला अपवाद ठरला आहे. हा रस्ता पूर्ण कच्चा माती व खडीचा होता. यापैकी नदीपलीकडील चौधरवाडी हद्दीतील रस्ता गगनबावडा सार्वजनिक बांधकाम विभागाने कोटय़वधीचा निधी खर्च करत दोन वर्षांपूर्वी रुंदीकरणासह डांबरीकरण करून केला आहे. मात्र, राधानगरीच्या हद्दीतील म्हासुर्ली बाजारपेठ चौक ते धामणी नदीवरील बंधाऱयापर्यंतचा रस्ता 30 वर्षांपासून पक्का होण्याच्या प्रतीक्षेत आहे आहे. सध्या या रस्त्यावरून पावसाचे मोठय़ा प्रमाणावर वाहणारे पाणी, दोन्ही बाजूंनी वाढलेली झुडपे, चिखल, मोठय़ा खड्डय़ांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यावर वाहणाऱया पाण्यामुळे या रस्त्याचा काही भाग खचू लागला आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे खड्डय़ांचा अंदाज येत नसल्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. सध्या या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद झाली आहे. वाहनधारकांना पर्याय ठरणाऱया भित्तमवाडी-गवशी बंधाऱयावरून सुमारे सहा किलोमीटरचा वळसा घालून कोकण व गगनबावडय़ाकडे प्रवास करावा लागत आहे. परिणामी हा मार्ग धोकादायक बनला आहे. येथून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.