आखाती देशांत युद्धाचा भडका; इराणचा सौदीच्या अरामको तेल प्रकल्पावर भीषण हल्ला, कतारचे गॅस उत्पादन ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील युद्ध आता केवळ लष्करी तळांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याने जागतिक अर्थव्यवस्थेच्या कण्यावरच प्रहार केला आहे. इराणने सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अरामकोच्या (Aramco) तेल शुद्धीकरण प्रकल्पावर भीषण बॉम्ब हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, कतारनेही खबरदारीचा उपाय म्हणून आपले एलएनजी (LNG) उत्पादन पूर्णपणे थांबवले आहे.

इराणवर झालेल्या इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सौदीच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर प्रकल्पाच्या परिसरात आगीचे प्रचंड लोट पाहायला मिळाले असून, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सौदी अरेबियाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा हल्ला केवळ एका देशावर नसून जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर केलेला हल्ला असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जगाचे डोळे आता आखाती देशांकडे लागले आहेत. अमेरिका आणि इस्रायल यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जर हे युद्ध असेच लांबले, तर जागतिक मंदीचे सावट निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्थानसाठी देखील ही चिंतेची बाब असून, कच्च्या तेलाच्या आयातीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.