
सामना प्रतिनिधी ।मुंबई
स्वप्नील साळवीच्या 28 चेंडूंतील तुफानी नाबाद 71 धावांच्या खेळीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबला एका स्वप्नवत विजयासह 12 व्या प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेतले हातून निसटू पाहणारे विजेतेपद काबीज करता आले. शिवाजी पार्क जिमखान्याने उभे केलेले 235 धावांचे डोंगराएवढे आव्हान मग हाती 10 चेंडू राखून विजेत्यांनी पार केले. या स्पर्धेतल्या तिन्ही सामन्यांमध्ये एमआयजीने आपल्या श्रेष्ठ फलंदाजीचे प्रदर्शन केले. शिवाजी पार्ककडून आकाश आनंद (96) आणि निनाद कदम (84) यांनीच अंतिम लढतीत ठळक कामगिरी बजावली. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्वप्नील साळवी याची तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शम्स मुलांनी (एमआयजी) याला गौरविण्यात आले. हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी मिलिंद रेगे, माजी आंतरराष्ट्रीय पंच सुरेश शास्त्री, विलास गोडबोले, रवी मांद्रेकर, दीपक जाधव, तुकाराम सुर्वे आदी मान्यवर क्रिकेटपटू उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
शिवाजी पार्क जिमखाना 20 षटकांत 7 बाद 234 (आकाश आनंद 96, निनाद कदम 84; आतिष गावंड 43 धावांत 2 विकेट, निखिल दाते 48 धावांत 2 विकेट). पराभूत विरुद्ध एमआयजी 18. 2 षटकांत 5 बाद 235. (स्वप्नील प्रधान 37, अर्जुन तेंडुलकर 25, सुमित घाडीगावकर 30, केव्नि अल्मेडा 30, गौरव जठार नाबाद 28, स्वप्नील साळवी नाबाद 71; सिद्धार्थ कोटक 26 धावांत 2 विकेट, संकेत भाये 38 धावांत 2 विकेट.
सामनावीर – स्वप्नील साळवी.
























































