
बँक ऑफ बडोदाने शुक्रवारी ‘ग्रीन राइड-एक पहल स्वच्छ हवा की ओर’ उपक्रमाचे सुपर- मॉडेल आणि फिटनेसप्रेमी मिलिंद सोमण यांच्यासह लाँच करत असल्याचे जाहीर केले. या उपक्रमाला गेल इंडियाचा पाठिंबा लाभला आहे. या उपक्रमाअंतर्गत मिलिंद सोमण 10 दिवस सायकल आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाने गुजरात, राजस्थान आणि हरयाणामार्गे दिल्लीपर्यंत प्रवास करणार आहेत. या प्रवासात ते सायकल सफर व धावून फिटनेस राखण्याबाबत प्रचार करणार आहेत.
स्वच्छ हवेचे महत्त्व समजावून देण्यासाठी आणि लोकांनी वाहतुकीचे शाश्वत पर्याय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ग्रीन राइडचे आयोजन करण्यात येत आहे. 3 डिसेंबर रोजी मुंबईतून ग्रीन राइडची सुरुवात झाली आणि 13 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीमध्ये त्याचा समारोप होईल. या प्रवासादरम्यान ते गोध्रा, बडोदा, उदयपूर आणि जयपूर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखांना भेट देतील.
बळकट राष्ट्रासाठी फिटनेस महत्त्वाचा
‘युवक आणि नागरिकांत फिटनेस हा बळकट राष्ट्रासाठी महत्त्वाचा घटक असून बँक ऑफ बडोदा शाश्वत जीवन तसेच पर्यावरण जपणुकीसह शारीरिक फिटनेस राखण्याच्या विचारसरणीला ठाम पाठिंबा देते. हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय फिटनेसप्रेमी मिलिंद सोमण यांच्या ‘ग्रीन राइड-एक पहल स्वच्छ हवा की ओर’ या उपक्रमाशी केलेले सहकार्य जागरूकता वाढवण्याचा आणि तरुण हिंदुस्थानींना कृती करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्याचे विस्तारित सामाजिक प्रभावामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आहे,’ असे बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा म्हणाले.

























































