बालपणी संघाच्या शाखेत जायचो, तेथील अनुभव वेगळाच! अभिनेत्याचा पुस्तकाद्वारे खुलासा

1080

मॉडेल, अभिनेता आणि तरुणांचा फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांचे ‘मेड इन इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित होणार असून यातील मजकुरामुळे ते चर्चेत आले आहे. या पुस्तकामध्ये मिलिंद सोमण यांनी बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जात होतो आणि तेथील माझा अनुभव वेगळा आहे, असा उल्लेख केला आहे. बालपणीच्या आठवणी वाचकांसोबत शेअर करताना सोमण यांनी पुस्तकात हे देखील म्हटले आहे की जेव्हा संघाचा संबंध सांप्रदायिकतेसोबत जोडला जातो तेव्हा आश्चर्य वाटते.

मिलिंद सोमण यांनी पुस्तकामध्ये असे नमूद केले आहे की, बालपणी ते मुंबईतील शिवाजीपार्क येथे भरणाऱ्या संघाच्या शाखेमध्ये जात होते. वडील संघाचे सदस्य होते आणि ते नियमित शाखेत जायचे. बालपणीच संघाच्या शाखेमध्ये गेल्यास मुलांना शिस्त लागते, ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतात आणि त्यांचे विचारही चांगले होताक, असे वडिलांना वाटायचे. बालपणी आजूबाजूची बरीच मुले संघाच्या शाखेत जात होती, असेही त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. तसेच मला तेथे गर्व वाटावे असे काहीही दिसले नाही, मात्र काही तक्रार करावी किंवा चुकीचेही काही वाटले नाही, असेही सोमण यांनी म्हटले आहे.

माझा अनुभव वेगळा

संघाबाबत आज जे आरोप होतात, जसे की आरएसएसच्या शाखा राजकीय अनुषंगाने चालतात, तेथे विध्वंसक गोष्टी होतात किंवा आरएसएस सांप्रदायिक असल्याचाही आरोप होतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते. संघाची आमची शाखा तेव्हा सायंकाळी 6 ते 7 दरम्यान भरत होती आणि माझ्या आठवणी, अनुभव वेगळे आहेत. आम्ही तिथे खाकी रंगाच्या चड्डीमध्ये जात होतो, योगा करत होतो, पारंपारिक वस्तूंचा वापर करून व्यायाम करायचो, खेळ खेळायचो, सहकाऱ्यांसोबत मजामस्ती करायचो, गाणी म्हणायचो आणि संस्कृत मंत्रांचा उच्चारही शिकायचो, मग भलेही आम्हाला त्याचा अर्थ माहिती नसला तरीही, असेही सोमण यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

दरम्यान, मिलिंद सोमण यांचे ‘मेड इन इंडिया-ए मोमॉयर’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. सोमण यांच्यासोबत लेखक रुपा पै यांनी सहलेखन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या