आता स्कॉच मिळणार नाही?  मिलिट्री कॅन्टीनमध्ये विदेशी वस्तूंना बंदी!

देशभरातील चार हजार लष्कराच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्कॉचसारखे विदेशी मद्य, मोबाईल, शुज या वस्तू आता बंद होणार आहेत. केंद्र सरकारने मिलिट्री कॅन्टीनमध्ये विदेशी वस्तूंच्या खरेदी-विक्रीला बंदी घातली आहे. दरम्यान हा निर्णय म्हणजे ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान’च्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे सांगितले जाते.

उच्च दर्जाच्या अनेक वस्तू अल्पदरात या कॅन्टीनमध्ये मिळतात. त्यात विदेशातील अनेक वस्तूंची खरेदी-विक्री होते. मात्र, विदेशी वस्तूंना मिलिट्री कॅन्टीनमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारच्या कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंटने म्हटले आहे.

या वस्तूंवर बंदी

स्कॉटलंडमधून येणारी स्कॉच, उंची मद्य, मोबाइल, ब्रँडेड वॉच, गॉगल्स, बॅग्ज, शुज, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू, सँडविच टोस्टर्स आदी विदेशात तयार झालेल्या वस्तूंची यापुढे मिलिट्री कॅन्टीनमध्ये विक्री होणार नाही.

5500 पैकी 420 वस्तू आयात केलेल्या

लष्कराच्या कॅन्टीनमध्ये सुमारे 5500 वस्तूंची विक्री होते. यातील 420 वस्तू आयात केलेल्या आहेत असे मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनेलिसिसने म्हटले आहे.

मोबाईल, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात चीनमधून होते. विदेशी वस्तूंवर बंदी घातल्यामुळे चीनला झटका बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या