दूध दरवाढ आंदोलनाचा राहुरी तालुक्याला फटका, ७० लाखांचं नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, राहुरी

दुधाच्या भाववाढीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे राहुरी तालुक्यात दुधाचे संकलन बंद राहिल्याने तब्बल ७० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची ओळख आहे. दरम्यान खर्चाच्या तुलनेत दुधाचे भाव तुटपुंजे झाल्याने दुधाला भाववाढ तसेच शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोमवारपासून चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज तालुक्यातील लहान मोठे सहकारी व खासगी दूध संकलन केंद्र, चिलिंग सेंटर बंद ठेवण्यात आल्याने राहुरी तालुक्यात ३ लाख लिटर दुधाचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. पर्यायाने दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांचे आज एकाच दिवशी ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आज आपल्याकडील दुधाचे मोफत वाटप केले.

तर दुधाला भाववाढ देण्यासाठी शासनाला सुबुद्धी मिळो ही मागणी करत गावोगावच्या मंदिरातील मारुती तसेच देवीच्या मूर्तीला दुधाने आंघोळ घालण्यात आली. आज चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुर विभागाचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील विशेष पोलीस कृतीदलाची तुकडी, राहुरीतील ३५ पोलीस व ५ पोलीस अधिकारी आज पहाटेपासूनच राहुरी तालुक्यातील संवेदनशील भागात तैनात झाले आहेत. राहुरी पोलिसांनी नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी हद्दीतील फॅक्टरी, शनी शिंगणापूर फाटा,नगर मार्गावरील नांदगाव हायवेला बंदोबस्त लावला आहे.

चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे आज राहुरी तालुक्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी १ लिटर दुधाचा उत्पादन खर्च ३२ रुपये असल्याचा अभिप्राय दिलेला आहे. खर्चाच्या तुलनेत राज्य शासनाला ४८ रुपये प्रतिलिटर दुधाचा भाव द्यावा लागणार आहे.मात्र महाराष्ट्रात अवघा १७ रुपये दुधभाव झाल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी शासनाच्या धोरणाने अडचणीत आला आहे.