
मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन जवळपास वर्ष होत आलं आहे, मात्र मंत्रिमंडळ विस्तार काही झालेला नाही. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचं कळतं आहे. मात्र त्याचवेळी चार मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. यामुळे मिंधे गटाचे वांदे होणार असल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यावर कुणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील चार प्रमुख मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. चार मंत्र्यांना काढा असे आदेश अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितले. त्यासोबतच मंत्रिमंळ विस्तार झाला तर अनेक मोठे स्फोट होतील, असं भाकितही संजय राऊत यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
























































