नक्षलवाद संपवण्याच्या नावाखाली खाण कंपन्यांचे हित; शिवसेनेने व्यक्त केला संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘बस्तरसारख्या भागातून संपूर्ण गावेच्या गावे हटवली जात आहेत. 3 लाख 50 हजाराहून अधिक आदिवासी बेघर झाले, ते आज कुठे आहेत,’ असा सवाल करताच, ‘नक्षलवाद संपवण्याच्या नावाखाली आदिवासींचे विस्थापन करून खाण कंपन्यांचे हित जपण्याचा प्रयत्न होत आहे का,’ असा संशय शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत व्यक्त केला.

नक्षलवादावर झालेल्या चर्चेत भाग घेताना अरविंद सावंत यांनी पेंद्र सरकारच्या धोरणांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘नक्षलवाद्यांना 20 फूट जमिनीत गाडून टाकण्याची भाषा देशाच्या गृह मंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. कायद्याच्या राज्यात कायद्याची जरब हवी, सुडाची भाषा नको. नक्षलवादाचा उगम हा अन्याय, शोषण आणि जमिनीच्या हक्कासाठीच्या लढय़ातून झाला आहे, हे विसरून चालणार नाही. केवळ दहशतीने हा प्रश्न सुटणार नाही. नक्षलवाद संपवण्यासाठी आदिवासींना जमीन, रोजगार, कृषी सुधारणा आणि आरोग्य सेवा या चार गोष्टी पुरवण्याची नितांत आवश्यकता आहे,’ असे सावंत यांनी सांगितले.