पदवीधर, शिक्षक निवडणुकीतून भाजपला चोख उत्तर; हसन मुश्रीफ यांची सुनावले

‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने जो कारभार केला आहे, त्यात ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने कोरोनाकाळात, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, तसेच कंगना राणावत प्रकरणात महाराष्ट्र राज्याचा अवमान केला, त्याला चोख उत्तर या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदानातून मिळाले आहे. त्यामुळे ‘पदवीधर’मध्ये ही अवस्था तर सर्वसामान्यांमध्ये काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी,’ असे खडे बोल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहेत.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या एका वर्षात महाविकास आघाडीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी जनता आतुर झाली आहे, अशी द्वेषपूर्ण वक्तव्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. मात्र, आजच्या निकालाने भाजपला चांगलीच चपराक बसली आहे.

चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे 12 वर्षे प्रतिनिधित्व करत होते, तर 55 वर्षे नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. संभाजीनगर मतदारसंघात तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने हॅट्ट्रिक केली आहे. हे मतदारसंघ सुशिक्षित असून, यासाठी पदवीधर मतदान करतात. भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवले. आमच्यातील एखाद-दुसरा आमदार फोडून पोटनिवडणूक झाली, तर त्यांचे डिपॉझिटही राहणार नाही.

सहा महिन्यांपूर्वी नागपूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. फडणवीस पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किती विकास करायला हवा होता? मात्र, महाविकास आघाडी आल्यानंतर सहा महिन्यांतच त्यांची ही जिल्हा परिषद गेली. आता पदवीधर मतदारसंघही गेला. त्यामुळे पराभवाचे आत्मचिंतन करणार नसतील, तर त्यांना लखलाभ असा टोलाही त्यांनी लगावला.

त्यांना हिमालयात जायचेच नव्हते

कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही. त्यांच्यासाठी कोणीतरी दुसऱ्य़ा पक्षाच्या आमदारांनी राजीनामा देऊन, होणाऱ्य़ा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास हिमालयात जाण्याची भाषा चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

मात्र, त्यांना हिमालयात जायचेच नव्हते. आता तर यापूर्वी तेच प्रतिनिधित्व करीत असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात दुसरा उमेदवार उभा करून त्यांचा 50 हजारांच्या प्रचंड मताने पहिल्या फेरीतच पराभव झाला. दुसऱ्य़ा पसंतीची मते मोजायची गरज लागली नाही. म्हणजेच हा महाविकास आघाडीचा देदीप्यमान विजय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या