न्यायदानात बीडचे मोठे योगदान –  जयदत्त क्षीरसागर

26

सामना प्रतिनिधी । बीड 

बीड जिल्ह्यातील वकिली व्यवसायात असणार्‍या अनेक नामांकित वकिलांचे न्यायदानात मोठे योगदान आहे. तसेच भूसंपादनाची प्रलंबीत प्रकरणे 15 दिवसात मार्गी लावू असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने जयदत्त क्षीरसागर यांचा बीड जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत संपादीत केलेल्या जमिनीच्या मावेजासाठी 11 कोटी 69 लाख मंजूर केल्याबद्दल वकील संघाच्या वतीने आभार व सत्काराचे आयोजन  करण्यात आला होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.अविनाश गंडले, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.अजय राख, अ‍ॅड.आनंद कुलकर्णी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वकील संघाच्या वतीने व विविध मान्यवरांनी क्षीरसागर यांचा सत्कार केला.

यावेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, बीडसारख्या ठिकाणी सुसज्ज आणि देखणी न्यायालयाची इमारत उभारण्याकरीता 100 कोटीचा निधी गरजेचा होता तो पाठपुरावा करून घेतला त्यामुळे ही भव्य इमारत डौलाने उभी आहे. वकील संघाच्या मागणीनुसार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याकरीता दोन बोअर तसेच कौटूंबिक न्यायलय आणि ग्राहक मंच ही दोन्ही कार्यालय न्यायालय परिसरात स्थलांतरीत करण्यासाठी संबंधीत अधिकार्‍यांची लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ. न्यायदानाच्या बाबतीत बीड जिल्ह्याचं मोठं योगदान असून न्यायाधीश पदावर जिल्ह्यातील अनेक भूमिपूत्र काम करत आहेत, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. तसेच कुठल्याही व्यवसायात ग्राहक हा केंद्रबिंदू असतो त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागते. अनेक वर्षांपासून रोहयो खात्याअंतर्गत अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत त्यातच बीडमधील संख्या अधिक असून ही बाब लक्षात येताच मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर मी जमीन मावेजासाठी 11 कोटी 69 लाख रूपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला. भूसंपादनाची प्रकरणे येत्या 15 दिवसांत मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 156 प्रकरणासाठी 45 कोटी रूपयांची तरतूद आवश्यक आहे यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत. याबात लवकरच विभागीय आयुक्त आणि संबंधीत अधिकार्‍यांची बैठक घेणार असून वकील संघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी नक्कीच पुढाकार घेऊ असेही ते यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या