सर्वांना लोकल प्रवास; दोन दिवसांत निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती

महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱयांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा करून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. या सर्वांशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर क्षेत्राकरिता लोकल सेवा सुरू करण्याबाबत विविध व्यावसायिक संघटना व प्रवासी संघटना आणि मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सध्या फक्त अत्यावश्यक सेवा वगळता महिलांसाठी सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सातनंतर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, घरेलू कामगार तसेच अन्य लोकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन हाच पर्याय आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत सध्या विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा करून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याबाबतही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अभय यावलकर, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध व्यावसायिक संघटना व प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या