पंचनाम्याचा अहवाल आल्यावर शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार – विजय वडेट्टीवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी सकाळी अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचनाम्याचा अहवाल आल्यावर तातडीने मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या तडाख्याने नद्यांना आलेला पूराने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी विजय वडेट्टीवार नांदेडला आले होते.

शासकीय विश्रामगृहात त्यांनी रविवारी सकाळी बैठक घेत नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,उमेश मुंढे, आनंदराव बोंढारकर, माजीमंत्री डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे. नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर पूर्ण करताना वेळप्रसंगी ड्रोनचाही वापर करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कोकणापासून विदर्भापर्यंत यावर्षी नैसर्गिक आपत्तीने घेरले असून या संकटाच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण भागातील रस्ते व लहान पुलांचे नुकसान झाले असून सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याचे लोकप्रतिनिधींनी त्यांना सांगितले.

निसर्ग कोपलाय, संकट मोठे आहे, पण, शेतकरी भावांनो खचून जाऊ नका. धीर सोडू नका, या कठीण समयी सरकार खंबीरपणे आपल्या पाठिशी आहे, अशा शब्दात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या नरसी व परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. नरसी येथील शिवारात पावसाने वाया गेलेल्या सोयाबीन पिकाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच मुखेड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. सलगरा, जांब येथील नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जात पाहणी केली.