बलात्कार आरोपींकडून धमक्यांना घाबरून अल्पवयीन पीडितेची आत्महत्या

716
प्रातिनिधिक

उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार संदर्भातील गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाहियेत. एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्यानंतर आरोपींनी तिला धमकावण्यास सुरूवात केली होती. त्याला कंटाळून पीडित मुलीने आत्महत्या केली आहे.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. 13 नोव्हेंबर रोजी कानपूर जिल्ह्यातील एका 16 वर्षीय मुलीला तीन नराधमांनी पळवून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी चार दिवसानंतर घरी पोहोचली. नंतर तिने पोलिसांत तक्रारहे दाखल केली. जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांसमोर तिने आरोपींची नावेही सांगितली. तरी आरोपींवर कारवाई झाली नाही. तिघे आरोपी गावात उजळ माथ्याने फिरत होते. त्यांनी पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिला दुसर्‍या गावात नातेवाईंकांकडे ठेवले होते.

ती दररोज घरी फोन करून विचारायची की आरोपींना अटक झाली का परंतु घरच्यांकडून नेहमीच नकारात्मक उत्तर मिळाल्यामुळे ती व्यथित व्हायची. फोन ठेवून ती रडायची आणि एका ठिकाणी गप्प बसायाची. अखेर शनिवारी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.

या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. वेळीच या आरोपींवर का कारवाई केली नाही या प्रश्नावर पोलिसांनी मौन बाळगले.

आपली प्रतिक्रिया द्या