अल्पसंख्याक म्हणतात, शिवसेना चालेल, पण भाजप नको!

1462

दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहेत. त्यामुळेच शिवसेना चालेल पण भाजप नको असे अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांचे मत होते. त्यांच्या आग्रहामुळेच शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालो, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी पवार यांनी भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाविकास आघाडीमागची भूमिका स्पष्ट केली. राज्यात तीन पक्षांचे जरी सरकार आले तरी याचे सगळे श्रेय हे अल्पसंख्याक समाजाला जाते. अल्पसंख्याक समाजाने भाजपविरोधात मतदान केले म्हणून राज्यात सत्ताबद्दल दिसून येत असल्याचे पवार म्हणाले.

समाजातील अनेक गोष्टींचा परिणाम सामाजिक न्याय विभागात असलेल्या घटकांना बसतो. यासाठी आपण जागरूक राहावे लागेल. एक जबरदस्त संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपण करायला हवी. आज तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसने लहान घटकांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी स्वतःकडे घेतली असल्याचे पवार यांनी सांगितले.

‘एनआरसी’चा त्रास भटक्या विमुक्तांनाही

‘सीएए’ व ‘एनआरसी’मध्ये अल्पसंख्याक समाजाला दुर्लक्षित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर भटक्या विमुक्तांनाही ‘एनआरसी’मुळे त्रास सहन करावा लागणार आहे. जे लोक आहेत ते कामानिमित्त एका जाग्यावर राहत नाहीत अशा लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही सांगावे लागणार आहे. त्यांचा पुरावा द्यावा लागणार आहे. ही वेळ भाजप सरकारमुळे भटक्या विमुक्त समाजातील लोकांवर आल्याचे ते म्हणाले.

‘सीएए’मध्ये देशातून बाहेर गेलेल्या अल्पसंख्याकांचा विचार नाही

देश स्वतंत्र होण्यापूर्वी मोठय़ा प्रमाणात अल्पसंख्याक समाजातील लोक देशाबाहेर गेले आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या काही भागांत वास्तव्य करणाऱया या लोकांना परत आपल्या या देशात यायचे आहे. त्यांचा तो अधिकार आहे. मात्र ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना ते मान्य नाही. ‘सीएए’ कायदा करताना याचा विचार केलेला नाही, अशी टीका पवार यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या