
सामना प्रतिनिधी। भाईंदर
शहराच्या विविध भागांमध्ये ठाण माडून बसलेले फेरीवाले हटवण्यास पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱयांना सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे आता खासगी ठेकेदाराची मदत घेतली जाणार असून त्यासाठी दरमहा वीस लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. म्हणजेच फेरीवाला हटाव ही मोहीमेसाठी महापालिका रोज सुमारे 70 हजार रुपये मोजणार आहे. त्यासाठी येणाऱया खर्चालादेखील मान्यता दिली असून आता तरी मीरा-भाईदरमधील रस्ते मोकळे होणार काय, असा सवाल विचारत आहे.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्राची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून फेरीवाल्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. रस्त्यांवरून नागरिकांना चालताही येत नाही. संध्याकाळी तर सर्व महत्त्वाचे रस्ते फेरीवाल्यांनी गजबजून जातात. या फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महासभेत तसेच स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. शहरातील नवघर रोड, बी.पी., रोड, भाईंदर पालिका स्टेशन रोड, मीरा रोड स्टेशन परिसर, सिल्व्हर पार्क रोड परिसर, शांतीनगर आदी 13 प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.
फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिकेचे एक पथक सध्या कार्यरत आहे. त्यात सहा पोलीस, दहा बाऊन्सर, गाडय़ा उचलणारे कर्मचारी आदींचा समावेश आहे. मात्र ही यंत्रण अपुरी पडते. या पथकाला फेरीवाले अजिबात जुमानत नाहीत. पालिकेची गाडी येतेय… सावधान.. अशी टीप आधीच दिली जाते. त्यामुळे गाडी येण्यापूर्वीच फेरीवाले गायब होतात. अतिक्रमणविरोधी पथक गेले की फेरीवाले काही मिनिटांतच पुन्हा हजर होतात. हे लक्षात घेऊन आता खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. एका कामगारामागे 959 रुपये याप्रमाणे 50 कामगारांची नियुक्ती करण्यात येईल. चार टेम्पो, 5 दुचाकी, वॉकीटॉकी, मोबाईल्स अशा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी दरमहा येणाऱया 20 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
वाहतूककोंडीची कटकट
पालिका कर्मचाऱयांना फेरीवाले जुमानत नसल्याने आता खासगी ठेकेदाराचा प्रयोग पालिका करणार आहे. पण त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या खरोखरच सुटणार काय, असा सवाल मीरा-भाईंदरवासीयांनी केला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या काळात प्रचंड वाहतूककोंडी होते. त्याचा त्रास रहिवाशांना होत असून वाहतूककोंडीची समस्या कायमची दूर करा, अशी मागणी केली आहे.

































































