यंदा हिंदुस्थानला मिळणार का मिस युनिव्हर्सचा मुकुट? ‘या’ सौंदर्यवतीकडून अपेक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2017मध्ये मानुषी छिल्लर हिने मिस वर्ल्डचा लखलखता मुकुट जिंकला आणि हिंदुस्थानचा 17 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. यंदा हीच उत्सुकता मिस युनिव्हर्स स्पर्धेविषयी लागलेली पाहायला मिळत आहे. कारण, यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत हिंदुस्थान सहभागी होणार आहे.

हिंदुस्थानकडून मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धेसाठी लखनऊ इथल्या वर्तिका सिंग हिची निवड झाली आहे. 26 वर्षांची वर्तिका सिंग हिने नुकताच मिस दिवा युनिव्हर्स 2019 ही स्पर्धा जिंकली आहे. आता ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करणार आहे. तिथे तिची लढत जगभरातून आलेल्या 76 सौंदर्यवतींशी होणार आहे. त्यासाठी तिने जय्यत तयारीही सुरू केली आहे.

वर्तिका सिंग
वर्तिका सिंग

हिंदुस्थानकडून मिस युनिव्हर्सचा मुकुट लारा दत्ता हिने 2000मध्ये जिंकला होता. त्यानंतर अद्यापर्यंत एकही हिंदुस्थानी सौंदर्यवती ही स्पर्धा जिंकू शकलेली नाही. त्यामुळे 19 वर्षांचा हा दुष्काळ संपवून पुन्हा एकदा हिंदुस्थानची सौंदर्यवती मिस युनिव्हर्स होणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.