Miss World 2025 – थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्रीने पटकावला मिस वर्ल्ड 2025 चा किताब

हैदराबादमध्ये शनिवारी (31 मे) रोजी मिस वर्ल्ड 2025 चा ग्रँड फिनाले पार पडला. यात थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्री हिने मिस वर्ल्ड 2025 चा किताब पटकावला. मिस युनिव्हर्स थायलंड आणि मिस वर्ल्ड व्यतिरिक्त, ओपलच्या नावावर मिस वर्ल्ड थायलंडचा किताब देखील आहे.

गेले 24 दिवस हैदराबादमध्ये मिस वर्ल्ड 2025 ची स्पर्धा सुरू होती. यानंतर शनिवारी हायटेक्स कन्व्हेन्शन सेन्टरमध्ये या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पाडला. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने ‘मिस वर्ल्ड 2025’चा मुकुट जिंकला. जगभरातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. हिंदुस्थानची नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली.

सुचाता चुआंगश्री हिचा जन्म 20 सप्टेंबर 2003 रोजी थायलंडमध्ये झाला. ती एक थाई मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा विजेती देखील आहे. ती मिस वर्ल्ड बनणारी पहिली थाई महिला आहे. यापूर्वी, ती ‘मिस युनिव्हर्स थायलंड 2024’ देखील राहिली आहे. तिचे कुटुंब व्यवसाय करते. तिने तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काजोंकिएत्सुक्सा शाळेतून पूर्ण केले आहे. तिने राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये पदवी प्राप्त केली आहे.