
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
महानगरपालिकेने तीन वर्षांपूर्वी चीनमधील ड्युनहाँग शहरासोबत सिस्टर सिटीचा करार केला होता. परंतु मनपातून आता या कराराची संचिकाच गहाळ झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणात कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली.
मनपा आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी शहरातील पर्यटन स्थळ आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. याचदरम्यान त्यांना मनपाने चीनमधील डयुनहाँग शहरासोबत केलेल्या कराराची माहिती मिळाली. त्यावर आयुक्तांनी मनपातील कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना तो करार आणि त्याविषयी माहिती सादर करण्यास सांगितले. हा करार झाला तेव्हा मनपात ही जबाबदारी सिकंदर अली यांच्याकडेच होती. परंतु सिकंदर अली विद्यमान आयुक्तांना तो करार उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडून कराराची संचिकाच गहाळ झाल्याचे समोर आले. त्यामुळे आयुक्त निपूण विनायक यांनी सिकंदर अली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटिसीत करण्यात आली आहे.






























































