तेजस्वी यादव बेपत्ता, बिहारमध्ये झळकले पोस्टर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र व बिहारचे माजी मंत्री तेजस्वी यादव हे लोकसभा निवडणूकीनंतर जनतेसमोरच न आल्याने ते सध्या कुठे आहेत यावरून बिहारच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरूनच सध्या ते बेपत्ता असल्याचे पोस्टर बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये लागले आहे. तसेच त्यांची माहिती देणाऱ्याला 5100 रुपयांचे रोख ईनामही देण्यात येणार असल्याचे या पोस्टर्सवर लिहलेले आहे.

लोकसभा निवडणूकीत राजदला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. या लाजिरवाण्या पराभवानंतर तेजस्वी यादव एकदाही जनतेसमोर आलेले नाही. बिहारमध्ये सध्या मेंदूज्वरामुळे 154 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यावरही राजदकडून कोणतीही प्रतिक्रीया नाही. त्यावरून पत्रकारांनी राजद नेते रघुवंश प्रसाद यांना हटकले असता त्यांनी तेजस्वी कदाचित वर्ल्डकप पाहायला इंग्लंडला गेले असावेत अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळे तेजस्वी सध्या नक्की कुठे आहेत याबाबत कुणालाही काही माहित नाही.

त्यावरून बिहारचे सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाशमी यांनी तेजस्वी यादव बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावले आहेत. तसेच त्यांची माहिती देणाऱ्याला 5100 रुपयांचे रोख बक्षिसही जाहीर केले आहे.