
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल गेल्या दोन वर्षांत 55 ते 60 टक्क्यांवरून थेट 97 टक्क्यांपार गेला आहे. या पुढे दहावीचे सर्व विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’मध्ये पास होतील यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार होत असून नव्या अभ्यास पद्धती, जादा क्लास असे विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.
पालिकेचा या वर्षी दहावीचा निकाल 97.10 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या राज्य आणि मुंबईच्या सरासरी 96.94 टक्के निकालापेक्षा पालिकेचा शाळांचा निकाल चांगला आला आहे. गेल्या दोन वर्षांत ही सुधारणा झाल्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी केंब्रिजसह ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत.
असा राबवणार उपक्रम
पालिकेच्या विद्यार्थ्याने केवळ 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण व्हावे असे उद्दिष्ट न ठेवता विद्यार्थ्याला किमान 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. गुण वाढावेत यासाठी नव्या पद्धती, गणित-इंग्रजीसाठी विशेष टेक्निक, विशेष प्रावीण्य असलेल्या शिक्षकांकडून ट्रेनिंग-सर्व विद्यार्थ्यांना लेक्चर, अधिकची शिकवणी, व्हिडीओ-ऑनलाइन प्रोग्रॅम, स्टडी रूम आदी माध्यमांतून शिक्षण दिले जाणार आहे.


























































