
गोवरवर मात करण्यासाठी पालिकेने सुरू केलेले ‘मिशन इंद्रधनुष्य’ पहिल्याच फेरीत फत्ते करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पहिल्या फेरीतच 100 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. 7 ते 12 ऑगस्टदरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत 2,806 बालकांचे व 296 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेची दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान राबवण्यात येणार आहे.
गोवर रुबेलावर मात करण्यासाठी पालिकेने विशेष ‘मिशन इंद्रधनुष्य 5.0’ मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये डिसेंबर 2023 पर्यंत गोवर रुबेलावर मात करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0’ मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशनानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कृती दल व मुंबईतील सात अतिजोखीमग्रस्त विभागांची बैठक घेण्यात आली होती.
असे होतेय काम
विशेष मोहीम सुरू असल्याच्या कालावधीत नियमित लसीकरणाचा विचार करता एकूण 1406 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील 11,539 बालकांचे व 1200 गरोदर मातांचे नियमित लसीकरण करण्यात आले आहे.





























































