Assembly election 2026 – तामिळनाडूत मुख्यमंत्र्यांच्या गाडीची झाडाझडती, निवडणूक भरारी पथकाकडून कसून तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 मार्चपासून सुरू झाली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, टीव्हीकेचा अध्यक्ष थलापती विजय यांनी सोमवारीच आपला अर्ज दाखल करत प्रचाराचा शुभारंभ केला. स्टॅलिन यांनी कोळतूर येथे रोड शो घेतला. त्यानंतर मंगळवारी ते आपल्या मूळ गावी प्रचाराला जात असताना तंजावरजवळ निवडणूक भरारी पथकाने त्यांची गाडी अडवली आणि झाडाझडती घेतली.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम.के. स्टॅलिन मंळवारी सकाळी चेन्नईहून विमानाने त्रिचीला पोहोचले आणि तिथून रस्तेमार्गाने तिरुवारूरकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान तंजावरजवळील सालियामंगलम येथे निवडणूक भरारी पथकाने त्यांचे प्रचार वाहन थांबवले. त्यानंतर निवडणूक भरारी पथकाने वाहनाची कसून झडती घेतली.

निवडणूक भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्हॅनच्या पुढच्या भागाची आणि मागचा दरवाजा उघडून सखोल तपासणी केली. या कारवाईत महिला पोलीस कर्मचारीही सहभागी होत्या. तपासणीत वाहनात काहीही संशयास्पद न आढळल्याने पथकाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

मुख्यमंत्री स्टॅलिन मंगळवारी आपल्या मूळ गावी म्हणजेच तिरुवारूर येथून प्रचाराच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता तिरुवारूर येथील दक्षिण रथ रोडवर आयोजित प्रचार सभेत ते सहभागी होणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री पुंडी कलैवाणन (तिरुवारूर – द्रमुक), मारीमुथू (तिरुथुपोंडी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मोहम्मद मुबारक (नन्निलम – SDPI) आणि टी.आर.बी. राजा (मन्नारगुडी – द्रमुक) या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत.