बैल गेला नी झोपा केला! अशीच राज्य सरकारची अवस्था, भास्कर जाधव यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली विधानसभा मतदारसंघात ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला त्यांना भविष्यात मातीत घालायचेच या निर्धाराने आजपासून दापोली विधानसभा मतदारसंघात भगव्या सप्ताहाला सुरुवात झाली असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली पत्रकारांशी दापोलीत बोलताना दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव म्हणाले की, बैल गेला नी झोपा केला अशीच काय ती अवस्था आहे. राज्यातील लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर अन्य राज्यात गेले. त्यामुळे लाखो तरुणांच्या तोंडातील घास या सरकारने काढून घेतला आहे. त्यानंतर यापेक्षा मोठे प्रकल्प आम्हाला देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एवढे मोठे मन नाही कि ते गुजरात सोडून महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देतील. असे कदापि होणार नाही. किंबहुना महाराष्ट्राला खिळखिळे करणे, महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी आहे ती दुबळी करून राज्याचे महत्व कमी करणे अशाच प्रकारचा कार्यक्रम केंद्र सरकारने विशेष करून भारतीय जनता पार्टीने हाती घेतला आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्री दावोसला गेले काय कि अन्य ठिकाणी गेले तरी काहीही त्यांच्या हाताला लागणार नाही. त्यांची केवळ ट्रीप होईल.अशाप्रकारचा घणाघात भास्कर जाधव यांनी दापोलीत पत्रकारांशी बोलताना केला.

कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर शेतकरी सदस्यांमधून कोकणाबाहेरील शेतकऱ्यांची नियुक्ती कृषी मंत्र्यांनी केली आहे. त्याबद्दल बोलताना जाधव म्हणाले की, यासंदर्भात आपण विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला, तुम्ही काय? चोरून नेणार आहात महाराष्ट्रातून, आता आमच्या विद्यापीठाचे सदस्यही तुम्ही चोरून नेत आहात असे सभागृहात विचारले त्यावेळी सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते मात्र कोणीही याचा प्रतिवाद केला नाही. आम्ही संघर्ष करत आहोत मात्र प्रत्येक बाबतीत कोकणावर अन्याय करण्याची पद्धत सुरु आहे ती अजूनही सुरूच आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या भागावर अन्याय झाला कि त्या अन्यायाच्या विरोधात ज्या तडफेने, ज्या आक्रमकपणे तुटून पडायला पाहिजे तसे पडत नाहीत. मी हा प्रश्न विचारला तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्रीही सभागृहात होते मात्र तेही तेव्हा काही बोलले नाहीत.

माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागर मतदार संघात नुकताच मेळावा घेतला त्यासंदर्भात विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, तो मेळावा न होता मेलावा झाला, त्याची संध्याकाळी 5 ची वेळ होती मात्र रामदास भाई यांना रात्री 8 वाजता यावे लागले. त्यांना तेथील नागरिकांनी नाकारले, त्यांची जागा दाखवून दिली. तेथे रामदास कदम यांनी पुढचा आमदार शिंदे गटाचा असेल, त्यांनी पुढचा उमेदवार महणून बेटकर यांचे नाव घोषित केले. दापोली आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांनी उत्तर सभा घेतली होती. त्यात त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे केदार साठे यांना सांगितले की डॉ.विनय नातू यांना निरोप द्या कि तुम्ही कामाला लागा, पुढच्या विधानसभेला मी तुम्हाला निवडून आणतो. आता म्हणतात बेटकर यांना निवडून आणतो, यावरून रामदास कदम यांच्या बोलण्याला ना शेंडा ना बुड. असे म्हणत जाधव यांनी रामदास कदम यांची खिल्ली उडवली.

या पत्रकार परिषदेला विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, माजी आमदार सुर्यकांत दळवी जिल्हा प्रमुख सचिन कदम, युवासेना राज्य कार्यकारणी कोअर कमेटी सदस्य आणि माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते.